विधानसभा उपाध्यक्षपदी विजय औटी बिनविरोध

Foto

मुंबई- गेल्या चार वर्षांपासून रिक्‍त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतल्यामुळे आ. विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

सध्या विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपच्या कोट्यातून हरिभाऊ बागडे यांच्याकडे आहे, तर विधानसभेचे उपाध्यक्षपद गेल्या चार वर्षांपासून रिक्‍त होते. भाजप-शिवसेना सरकारचा अवघा एक वर्षाचा कार्यकाळ उरला असताना आ.औटी यांची या रिक्‍त पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. २८ नोव्हेंबरला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्ज दाखल केले होते. आ. सपकाळ व आ. कडू यांनी आज आपले अर्ज मागे घेतल्याने आ.औटी यांची बिनविरोध निवड झाली.आ. विजय औटी हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. २००४ पासून ते सातत्याने शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेले असून, त्यांची आमदारकीची ही सलग तिसरी टर्म आहे.